जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची कळंब काँग्रेसची मागणी – राज्यपालांना निवेदन सादर

कळंब (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने नुकताच मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर आणि संविधानिक मूल्यांवर गदा आणणारा असल्याने, हा कायदा तात्काळ रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. या संदर्भात कळंब तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. राज्यपालांना उद्देशून निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जनसुरक्षा कायद्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैचारिक मतभेद मांडण्याचा अधिकार आणि शांततापूर्ण आंदोलनाचा हक्क हे संविधान प्रदत्त अधिकार धोक्यात येतील. शासनाविरोधातील कोणतीही वैचारिक टीका गुन्हा ठरणार असून, त्यामुळे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, राजकीय नेते तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्या हक्कांचे उल्लंघन होईल.काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले की, हा कायदा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. या कायद्याविरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष केला जाईल, जनतेला जागरूक करण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर जनजागृती मोहीम राबवली जाईल आणि गरज पडल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.महाराष्ट्र ही संत-महात्म्यांची भूमी आहे, जी लोकशाही आणि विचारस्वातंत्र्याची शिकवण देते. त्या परंपरेच्या विरोधात जाणारा हा कायदा काँग्रेस कधीही सहन करणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.या वेळी कळंब तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पांडुरंग कुंभार , कळंब शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शशिकांत निर्फळ यांच्या हस्ते निवेदन उपविभागीय कार्यालयला मार्फत राज्यपालांना देण्यात आले. या निवेदनावर महिला काँग्रेस च्या ज्योती सपाटे, युवक काँग्रेस जिल्हा सचिव भूषण देशमुख,ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष विश्वंभर मैंदाड,जिल्हा सरचिटणीस कलीम तांबोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पवार, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष अंजली ढवळे, कळंब शहर महिला अध्यक्ष अर्चना नखाते, पृथ्वीराज देशमुख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष इरफान बागवान, किसान काँग्रेस अध्यक्ष शीलानंद शिनगारे, युवक विधानसभा उपाध्यक्ष रोहित कसबे , मागासवर्गीय सेल अध्यक्ष बबन हौसलमल, कामगार सेल अध्यक्ष विशाल वाघमारे, दत्ता अंबिरकर,नासर शेख, विद्यार्थी काँग्रेस चे मकसूद शिकलगार, रोहन कोठावळे, गौरव रोडे, समीर बागवान, विकास मुंढे, राजू बागवान, वैशाली धावारे, स्नेहल कदम , संध्या कदम, विमल खराडे, ज्योती जगताप, जयश्री महामुनी, शेवता स्वामी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.