महायुतीमधील अंतर्गत भांडणांचा फटका विकासाला; काँग्रेसचा इशारा – स्थगिती उठवा, अन्यथा आंदोलन

कळंब : धाराशिव जिल्हा नियोजन कमिटी अंतर्गत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या महत्त्वाच्या विकासकामांवर शासनाने घातलेली स्थगिती तात्काळ उठवावी, अशी मागणी कळंब तालुका व शहर काँग्रेस (आय) कमिटीने केली आहे. या संदर्भात तहसीलदार कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून, स्थगितीमुळे गावोगावी विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रस्ते, पूल, नाले बांधकाम, जलसंधारण योजना, DP मार्गांची उभारणी, शाळा व अंगणवाडींचे नूतनीकरण, सार्वजनिक उद्याने आणि सामाजिक सुविधांची कामे मंजूर झाली होती. मात्र शासनाने अचानक घातलेल्या स्थगितीमुळे या कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. विविध करांच्या माध्यमातून जनतेकडून उभारलेला निधी महायुतीमधील अंतर्गत भांडणामुळे अडकला आहे, ही परिस्थिती जनतेसाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी सांगितले की, शासनाने स्थगिती घालून विकासाच्या वाटचालीला ब्रेक लावला आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये रस्ते, पूल, शाळा, अंगणवाड्या आणि जलसंधारण प्रकल्पांचा समावेश आहे. ही कामे लांबणीवर टाकल्यामुळे मंजूर निधी खर्च न होता परत जाण्याची शक्यता आहे. “जनतेचाच पैसा वाया जाऊ नये म्हणून स्थगिती तातडीने उठवावी, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा त्यांनी दिला.या निवेदनावर तालुका काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग कुंभार, कळंब शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शशिकांत निर्फळ, महिला काँग्रेसच्या ज्योती सपाटे, युवक काँग्रेस जिल्हा सचिव भूषण देशमुख, ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष विश्वंभर मैंदाड, जिल्हा सरचिटणीस कलीम तांबोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पवार, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष अंजली ढवळे, कळंब शहर महिला अध्यक्ष अर्चना नखाते, काँग्रेस नेते पृथ्वीराज देशमुख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष इरफान बागवान, किसान काँग्रेस अध्यक्ष शीलानंद शिनगारे, युवक विधानसभा उपाध्यक्ष रोहित कसबे, मागासवर्गीय सेल अध्यक्ष बबन हौसलमल, कामगार सेल अध्यक्ष विशाल वाघमारे, दत्ता अंबिरकर, नासर शेख, विद्यार्थी काँग्रेसचे मकसूद शिकलगार, रोहन कोठावळे, रोहन कुंभार, गौरव रोडे, समीर बागवान, विकास मुंढे, राजू बागवान, वैशाली धावारे, स्नेहल कदम, संध्या कदम, विमल खराडे, ज्योती जगताप, जयश्री महामुनी, शेवता स्वामी तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, स्थगिती उठवून विकासकामांना गती दिली नाही तर तालुका व शहर काँग्रेस जनतेसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर असेल.
