तमाम हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या आ. परिणय फुके यांनी माफी मागावी – शिवसेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांची आक्रमण मागणी.

धाराशिव – आमदार परिणय फुके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना बरळून तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये,”देवेंद्र फडणवीस हे प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान, श्रीकृष्णा सारखी चातुर्य बुद्धी, देवाधी देव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे, आणि त्यांच्यासारखे विष पचवणारे तसेच सूर्यासारखे तेज असणारे, चंद्रासारखे शीतल असणारे देवेंद्र फडणवीस आहेत ” असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या भाजपला व देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य आहे का? असा सवाल या माध्यमातून उपस्थित होतो. आमदार परिणय फुके यांच्या या बालिश वक्तव्यामुळे देवांचे देव महादेव, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आदी हिंदूंचे भक्तिस्थान व शक्तीस्थान असणाऱ्या मुख्य देवतांचा तर अपमान आहेच पण त्यासोबतच सूर्य देवता व चंद्र देवता यांचाही हा अपमान आहे. ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेना फोडली त्यांची तुलना श्रीकृष्णांच्या चातुर्य बुद्धीशी करणं हास्यास्पद आहे. त्यासोबतच फडणवीस साहेबांना सहनशक्ती असती तर त्यांनी पक्ष फोडाफोडी केली असती का? कारण त्यांच्या सत्तापिपासू धोरणा मुळेच त्यांनी भाजपची तत्व, मूल्ये भ्रष्टाचारी लोकांना पक्षात व महायुती मधे घेऊन धुळीस मिळवली आहेत.आमदार फुके यांनी फडणवीसांची स्तुती करणाऱ्याला विरोध नाही परंतु जी विशेषणे किंवा देवतांच्या ज्या उपमा त्यांनी मनुष्य असणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री यांना दिली आहेत त्यामुळे देवता व मनुष्य यात काही फरकच चाटुगिरी करणाऱ्या आमदार फुके यांनी ठेवलेला नाही. त्यामुळे परिणय फुके यांची भूमिका हिंदुत्ववादी भाजपा व फडणवीस यांना मान्य आहे का हा मोठा प्रश्न या माध्यमातून उपस्थित होतो. त्या प्रश्नाचे निराकरण आमदार फुके यांच्या माफीनाम्यातून होणार आहे त्यामुळे फुके यांनी तमाम हिंदूंची, भक्तांची माफी मागितली पाहिजे. अन्यथा देवांचे देव महादेव, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण या सर्व हिंदूंच्या देवतांचा अपमान केल्याचा निषेध म्हणून या सर्व देवतांचा अभिषेक घालून भाजपा व फुके यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून अभिषेक करण्यात येईल, असे युवासेनेचे धाराशिव जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
