विजयमाला पौळ यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा अन्नदाता पुरस्कार जाहीर

कळंब :- आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे कळंब मार्गे विदर्भ तथा मराठवाडय़ातील जवळपास अडीचशे ते तिनशे पायदळ दिंड्या हरी नामाचा गजर करीत मार्गक्रमण करतात या दिंडीतील वारकऱ्यांना कळंब येथील सदभक्त भोजनाची व्यवस्था करतात या अन्नदान करणाऱ्या भक्तापैकी प्रतिवर्षी एक भक्ताचा कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी “विठ्ठल रुक्मिणी अन्नदाता पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षीचा अन्नदाता पुरस्कार कळंब येथील अन्नदाते श्रीमती विजयमाला रामदास पौळ यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली. पौळ कुटुंब परंपरेने वारकऱ्यासाठी “अन्नदान” सेवेत असून ही परंपरा नारायण तुळजाराम पौळ यांच्यापासून सुरू आहे. पुढे दुसऱ्या पिढीत रामदास नारायण पौळ व गेली बावीस वर्ष विजयमाला रामदास पौळ व त्यांचे चिरंजीव नामदेव रामदास पौळ संत भोजाजी महाराज आजमसारा ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील दिंडीतील वारकऱ्यास अन्नदान करतात. पत्रकार संघाचे पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष असून, लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक शिंदे यांनी सांगितले आहे.